गुणीजन सन्मान
समाजहितासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा गौरव व्हावा आणि त्यांच्या कार्यातून समाजाला निरंतर प्रेरणा मिळावी, याच भावनेतून समितीतर्फे 'गुणीजनांचा सन्मान' हा उपक्रम राबवला जातो.
अहमदाबाद, गुजरात येथे आयोजित प्रथम जागतिक योगासन चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत रौप्यपदक पटकावून श्री. रोहितकुमार चव्हाण यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
या अभिमानास्पद कामगिरीबद्दल त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन लोक उत्कर्ष समितीतर्फे स्मृतिचिन्ह (Memento) प्रदान करून श्री. रोहितकुमार चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला.
सलोनी अर्जुन मेस्त्री
राष्ट्रीय निबंध स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिक पटकावणाऱ्या सलोनी अर्जुन मेस्त्री हिचा लोक उत्कर्ष समितीतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.
सन्मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. त्याबद्दल लोक उत्कर्ष समितीच्या कार्यालयात रविवारी अध्यक्ष विद्यानंद देवधर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक प्रमोद ढोले यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा. शैलजा मंडले, उपेंद्र सांगवडकर, दीपक सांगलीकर उपस्थित होते.
डॉ. शिवशंकर मारजक्के
देशातील सर्वोच्च न्यूरो संस्था ‘श्री चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी’ (SCTIMST), त्रिवेंद्रम यांच्याकडून न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मारजक्के यांना अत्यंत मानाच्या ‘ॲवॉर्ड ऑफ एक्सलन्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. संस्थेच्या ५० वर्षांच्या इतिहासात प्रथमच हा बहुमान देण्यात आला आहे.
डॉ. मारजक्के यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आणि रुग्णसेवेतील अग्रगण्य योगदानाबद्दल लोक उत्कर्ष समितीतर्फे कणेरी मठ येथील हॉस्पिटलमध्ये त्यांची भेट घेऊन त्यांना मोमेंटो (स्मृतिचिन्ह) व सन्मानपत्र देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक मा. प्रमोदजी ढोले, लोक उत्कर्ष समितीचे अध्यक्ष मा. विद्यानंदजी देवधर यांच्यासह समितीचे अन्य स्वयंसेवक उपस्थित होते.